
फुगे फोडून अनिष्ट प्रथांच्या विळख्यातून मुक्ततेचा अनोखा संदेश

पिंपरी चिंचवड :-
(संपादक) :- शाम सोनवणे
“संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक किंवा भाषणबाजीचा विषय नसून, ती एक जीवनपद्धती आहे. मानवी मूल्यांना पायदळी तुडवणाऱ्या अनिष्ट प्रथांचा अंत संविधानाने केला आहे,” असा सूर पिंपरी येथील संविधान कार्यशाळेत उमटला.
संविधान गुणगौरव समिती (रायगड) आणि संविधान सजगता मंच (पिंपरी-चिंचवड) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२२ फेब्रुवारी) ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात ‘संविधान गुणगौरव परीक्षा’ २०२५-२६ मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनव उद्घाटन: अनिष्ट प्रथांच्या फुग्यांचा स्फोट
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मा. अविनाशजी चिलेकर यांच्या हस्ते अत्यंत कल्पक पद्धतीने झाले. संविधानाच्या प्रास्ताविकेवर जातीभेद, स्त्री-पुरुष असमानता, हुकूमशाही आणि आर्थिक विषमता अशा अनिष्ट प्रथांची नावे असलेले फुगे लावण्यात आले होते. मान्यवरांनी हे फुगे फोडून, संविधानाने या जोखडातून माणसाला मुक्त केले, हा संदेश दिला. ही संकल्पना नूरखाँ पठाण यांची होती.
‘घर-घर संविधान’ मोहिमेचा संकल्प
मुख्य मार्गदर्शक नूरखाँ पठाण यांनी ‘घर-घर संविधान’ या मोहिमेची व्याप्ती स्पष्ट केली. रायगडमधील माणगाव, तळा आणि डोंबिवली परिसरातील शाळांमध्ये लाखो विद्यार्थ्यांपर्यंत संविधान पोहोचवल्यानंतर आता पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातही ही मोहीम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मान्यवरांचे विचार
- मानव कांबळे (अध्यक्ष): “सामान्य जनता आणि सुशिक्षित नागरिकही छोट्या आर्थिक लाभासाठी लोकशाही मूल्यांशी तडजोड करतात हे दुर्दैवी आहे. आता तरी संविधानातील हक्क आणि कर्तव्यांबाबत गांभीर्याने जागृत होण्याची गरज आहे.”
- अविनाश चिलेकर: “राजकीय व्यक्ती आणि पत्रकारांसाठीही अशा संविधान कार्यशाळेची सध्याच्या काळात मोठी गरज आहे.”
उपस्थित मान्यवर
या प्रसंगी प्रा. नलिनी जाधव, प्रा. रजनी वाघमारे-घोडके, विलास पवार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, शरदराव जाधव, रवींद्र दुधेकर, वसंतराव साळवी, प्रदीप पवार, नरेंद्र बनसोडे, विष्णू मांजरे, संदीप जांभुळकर, कैलास पाटील, संजय बनसोडे व शहाजी कांबळे,शाम सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर प्रास्ताविक अनिल सूर्यवंशी यांनी मांडले. सुजाता बनसोडे, संदीप जांभुळकर व संजय बनसोडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. सभागृह गर्दीने तुडुंब भरले होते. आगामी काळात संविधान सजगता मंचातर्फे पथनाट्य आणि शैक्षणिक संस्थांमध्ये विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.


समाजोपयोगी कार्यक्रम आहे.सर्वांपर्यंत संविधान पोहचले पाहिजे.
जनता टाईम्स चे वृत्तांकन फार सुंदर आहे.
right
स्तुत्य समाजोपयोगी उपक्रम आहे.
जनता टाईम्स चे वृत्तांकन छान आहे.
जनता टाईम्स ला हार्दिक शुभेच्छा
💐💐👍🏻
thanks sir
उत्कृष्ट समाजोपयोगी उपक्रम आहे.याला सर्वांनी पाठबळ दिलेच पाहिजे.
जनताटाईम्स चे वृत्तांकन फार छान आहे
अभिनंदन व शुभेच्छा
💐
thanks sir