पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरी सुविधांचा आढावा घेण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत महत्त्वाची बैठक घेतली. “नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करा आणि विकासकामांमध्ये पारदर्शकता राखून प्रकल्पांना गती द्या,” अशा कडक सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत अण्णा बनसोडे यांनी शहरातील विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीच्या सुरुवातीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विधानसभा उपाध्यक्षांचे स्वागत केले आणि शहरात सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
मतदारसंघातील प्रश्नांवर विशेष लक्ष
अण्णा बनसोडे यांनी प्रामुख्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकास, पाणीपुरवठ्याचे विस्कळीत नियोजन, स्वच्छता व्यवस्था आणि नगररचना विभागातील प्रलंबित प्रकरणांवर चर्चा केली. शहरातील पायाभूत सुविधांचे काम करताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, जे प्रकल्प तांत्रिक कारणांमुळे रखडले आहेत, त्यातील अडचणी दूर करून ते वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन मांडले.
प्रशासकीय पारदर्शकतेवर भर
बैठकीत प्रशासकीय कामकाजावर चर्चा करताना बनसोडे म्हणाले की, “महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या प्रत्येक प्रकल्पात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करून सर्वसामान्यांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत, याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी.”
अधिकारी व विभागप्रमुखांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, कार्यकारी अभियंता विजय भोजणे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील कामांची प्रगती आणि भविष्यातील नियोजनाबाबत विधानसभा उपाध्यक्षांना आश्वस्त केले.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
