
संपादक – शाम सोनवणे
पिंपरी-चिंचवड शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या विविध विकासकामांना आज स्थायी समितीच्या बैठकीत हिरवा कंदील दाखवण्यात आला. यामध्ये पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग, चिखलीतील सांडपाणी प्रकल्प आणि शहरातील सायकल ट्रॅकच्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे होते. या बैठकीला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर यांच्यासह स्थायी समितीचे सर्व सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
पीएमपीएमएल सेवकांना दिलासा: पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोग फरकाचा दुसरा हप्ता देण्यासाठी, सन २०२५-२६ च्या संचलन तुटीपोटी अग्रीम रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली.
सांडपाणी पुनर्वापर (चिखली प्रकल्प): चिखली येथील ५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या ‘अल्ट्राफिल्ट्रेशन प्लांट’मधून प्रक्रिया केलेले सांडपाणी पुरवण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
सायकलिंग उपक्रमाला गती: शहरात शाश्वत दळणवळण आणि सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सल्लागार नेमणे आणि बीआयसीआय (BICI) संस्थेकडून प्राप्त अनुदानातून सायकल ट्रॅक व पायाभूत सुविधांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.
झोपडपट्टी भागात नवीन शौचालये: प्रभाग क्र. ७ (शांतीनगर) आणि प्रभाग क्र. ८ (बालाजीनगर) मधील जुनी व मोडकळीस आलेली सामुदायिक शौचालये पाडून त्या ठिकाणी अद्ययावत नवीन शौचालये उभारली जाणार आहेत.
आरोग्य आणि स्वच्छता: महापालिका रुग्णालयांत कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणे, तसेच डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी क्षेत्रीय कार्यालयांना फॉगिंग मशीनसह वाहने भाड्याने घेण्याच्या खर्चास मंजुरी दिली.
”शहराचा समतोल विकास साधतानाच नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा आणि शाश्वत वाहतूक पर्याय उपलब्ध करून देण्यावर आमचा भर आहे. आज मंजूर करण्यात आलेल्या विषयांमुळे प्रलंबित कामांना गती मिळेल.”
— अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती.
याशिवाय, पालिकेचे जलतरण तलाव भाडेतत्वावर चालवण्यास देणे, विविध विभागांसाठी लॅपटॉप खरेदी आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या कामकाजासाठी कर्मचारी संख्या वाढवणे अशा विविध प्रशासकीय विषयांनाही या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

