संपादक – शाम सोनवणे :–
पिंपरी (दि. २९ मे २०२६): फुगेवाडी येथे घडलेल्या विषारी दारू प्रकरणात बाधित झालेल्या व यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयाला भेट दिली. या दुर्घटनेतील सर्व रुग्णांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार केले जातील, अशी घोषणा आयुक्तांनी यावेळी केली. तसेच त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधून त्यांना धीर दिला.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वला अंदूरकर, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांच्यासह रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
उपचार व्यवस्थेचा घेतला आढावा
भेटदरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णालयातील उपचार व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. “रुग्णांच्या उपचारात कोणतीही कमतरता पडू देऊ नका,” अशा कडक सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पूर्णपणे सतर्क राहावे आणि येणाऱ्या प्रत्येक बाधित रुग्णाला तात्काळ दाखल करून घेऊन उपचार सुरू करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
नातेवाईकांना दिला धीर
रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले की, महापालिकेचे वैद्यकीय पथक २४ तास रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. रुग्णांना लवकरात लवकर बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. “काळजी करू नका, महापालिकेची संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे,” असा विश्वास त्यांनी नातेवाईकांना दिला.
अधिकृत प्रतिक्रिया:
“विषारी दारू प्रकरणातील दाखल सर्व रुग्णांवर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यासाठी वायसीएम रुग्णालय प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याच्या तसेच परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.” — डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
“वायसीएम रुग्णालयात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ञ डॉक्टर आणि पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. सध्या तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. इतर कोणत्याही नागरिकाला त्रास जाणवत असल्यास त्यांनी वेळ न घालवता तात्काळ रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावेत.” — डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
