
भोसरी (प्रतिनिधी):
राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या आशेने पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या तरुणांची एजंटकडून आर्थिक फसवणूक केली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राचे उद्घाटन आज (दि. ९ एप्रिल २०२६) भोसरी येथील संविधान चौकाजवळील फुगे प्रायमा येथे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची मोठी संधी
या केंद्राच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना महापौर रवि लांडगे म्हणाले की, “ज्या मुलांकडे कौशल्य आहे पण आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अशा शेवटच्या घटकातील मुला-मुलींना या केंद्रातून १००% मोफत सेवा मिळणार आहे. बाहेरून येणाऱ्या होतकरू मुलांना राहण्याच्या जागेपासून ते जॉब मिळेपर्यंत प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही ही केंद्रे पूर्णपणे विनामूल्य सुरू केली आहेत.”
काय आहेत या केंद्राची वैशिष्ट्ये?
- १००% मोफत सेवा: नोंदणी, नोकरीच्या संधी आणि करिअर समुपदेशन यासाठी एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही.
- सर्व शैक्षणिक पात्रता ग्राह्य: १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग (B.E, M.E, M.Tech) तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एससी अशा सर्व शाखांतील उमेदवारांना मार्गदर्शन मिळणार.
- फसवणुकीपासून मुक्ती: ‘विनामूल्य नोकरी’ हेच मुख्य उद्दिष्ट असल्याने एजंटच्या जाचातून तरुणांची सुटका होणार.
- मोठ्या प्रमाणात प्रतिसाद: आतापर्यंत सुमारे २,००० युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे.
येथे करा नोंदणी:
इच्छुक उमेदवारांनी खालील पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे: १. भोसरी केंद्र: संविधान चौक, फुगे प्रायमा, A विंग, तिसरा मजला, ऑफिस नंबर १२. २. चाकण केंद्र: कॅपिटल स्क्वेअर.
यावेळी उद्घाटन प्रसंगी डॉ. संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे, प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड. प्रतीक बोराडे यांसह अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
“विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे,” अशा भावना महापौर रवि लांडगे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
