
कचरा व्यवस्थापनासाठी विदेशी तंत्रज्ञान; अण्णासाहेब मगर स्टेडियमचा होणार कायापालट
पिंपरी, दि. 6 मार्च 2026 (संपादक ) – शाम सोनवणे
“महापौर पद स्वीकारल्यानंतर केवळ खुर्चीवर न बसता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याला मी प्राधान्य दिले आहे. गेल्या ३० दिवसांत शहराच्या विविध भागांचा दौरा करून नागरिकांच्या प्रश्नांची जी यादी तयार केली आहे, त्यावर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे,” असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. महापौर पदाचा एक महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाणी आणि आरोग्यासाठी फिल्ड व्हिजिट
पदभार स्वीकारल्यापासून महापौरांनी आपला जास्तीत जास्त वेळ फाईली पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणी करण्यात घालवला आहे. चिखली आणि आकुर्डी येथील जलशुद्धीकरण केंद्रांना भेटी देऊन त्यांनी पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. केवळ आढावा न घेता, पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांना डेडलाईनही दिली आहे. तसेच, शहरातील वाढत्या भटक्या श्वानांच्या प्रश्नावर त्यांनी तातडीने विशेष वाहने आणि श्वान संगोपन केंद्रे उभारण्याचे धोरण स्पष्ट केले आहे.
अण्णासाहेब मगर स्टेडियमचा आंतरराष्ट्रीय चेहरा
शहरातील क्रीडा संस्कृतीला बळ देण्यासाठी पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियमचा खासगी भागीदारीतून (PPP) विकास करण्यात येणार आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करण्याचा महापौरांचा मानस आहे. यामुळे स्थानिक खेळाडूंना जागतिक दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ग्रीन पिंपरी-चिंचवड: उद्यानांमध्ये ‘ऑक्सिजन सेंटर’
पर्यावरण संवर्धनासाठी महापौरांनी ‘ऑक्सिजन सेंटर’ची नवी संकल्पना मांडली आहे. शहरातील प्रत्येक उद्यानात अशा प्रकारचे केंद्र उभारून नागरिकांना शुद्ध हवा मिळवून देण्यासोबतच प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात लोकसहभागावर अधिक भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
‘अजित सृष्टी’ प्रकल्पाला गती
उपमुख्यंमत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महत्त्वाकांक्षी ‘अजित सृष्टी’ प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. याशिवाय कचरा व्यवस्थापनासाठी परदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून ते शहरात राबविण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.
येत्या काळात महापालिका प्रशासकीय कामात अधिक पारदर्शकता आणून प्रत्येक विभागीय कार्यालयाचा सखोल आढावा घेणार असल्याचेही महापौरांनी यावेळी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला उपमहापौर शर्मिला बाबर, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Hi there! Wishing you a great day ahead.
Greetings, I’m writing to selected site administrators about development funding. Your website appears to meet my criteria. Would you like to explore this? Please contact me on WhatsApp +66992530787