संपादक – शाम सोनवणे (पुणे ) : वय वर्ष ७४, कर्करोगाचा चौथा टप्पा आणि पूर्णपणे गेलेला आवाज… अशा कठीण परिस्थितीतही जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या जोरावर पिंपरी-चिंचवडच्या एका रुग्णाने मृत्यूला हुलकावणी दिली आहे. तळेगाव दाभाडे येथील टीजीएच ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर (OLCC) मध्ये झालेल्या प्रगत उपचारामुळे जनार्दन उमाळे यांचा घशाचा कर्करोग तर बरा झालाच, पण त्यांचे स्वरयंत्र (Larynx) वाचवण्यातही डॉक्टरांना यश आले आहे.
लक्षणे आणि आजाराचे स्वरूप:
जनार्दन उमाळे यांना सुरुवातीला आवाज बसण्याचा त्रास जाणवू लागला होता. त्याचबरोबर मानेच्या उजव्या बाजूला एक वेदनारहित गाठ आली होती. अवघ्या तीन महिन्यांत त्यांचा आवाज इतका क्षीण झाला की त्यांना लोकांशी बोलणेही कठीण झाले. यामुळे ते मानसिकदृष्ट्या खचले होते आणि सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहू लागले होते. तपासाअंती त्यांना चौथ्या टप्प्यातील ‘पायरीफॉर्म सायनस’ कर्करोग असल्याचे निदान झाले.
प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा आधार:
रुग्णाची परिस्थिती पाहता रेडिएशन ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. गौरव जसवाल आणि युनिट प्रमुख डॉ. संतोष साहू यांच्या टीमने शस्त्रक्रियेऐवजी ‘ऑर्गन प्रिजर्व्हिंग’ (अवयव जतन) उपचार पद्धती निवडली. यामध्ये हेलिकल टोमोथेरपी आणि सिस्प्लॅटिन केमोथेरपी यांचा एकत्रित वापर करण्यात आला. या प्रगत तंत्रज्ञानामुळे कर्करोगाच्या पेशींवर अचूक मारा करणे शक्य झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या निरोगी पेशींना इजा पोहचली नाही.
मिळाले नवजीवन:
उपचार सुरू झाल्यानंतर १६ आठवड्यांच्या कालावधीत चमत्कारिक सुधारणा पाहायला मिळाली. उमाळे यांचा आवाज पूर्वीपेक्षाही स्पष्ट झाला असून त्यांच्या मानेतील गाठ पूर्णपणे नाहीशी झाली आहे.
”मी पुन्हा कधी बोलू शकेन असे मला वाटले नव्हते, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला माझे जुने आयुष्य परत मिळाले आहे,” अशी भावना श्री. जनार्दन उमाळे यांनी व्यक्त केली.
डॉक्टरांचा मोलाचा सल्ला:
डॉ. जसवाल यांनी सांगितले की, जर उपचाराला थोडाही विलंब झाला असता, तर उमाळे यांना आपला आवाज कायमचा गमवावा लागला असता. कर्करोग बरा झाल्यानंतरही रुग्णांनी मऊ आहार घेणे, मानेचे व्यायाम करणे आणि तंबाखू-धूम्रपानापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.
आधुनिक वैद्यकीय शास्त्रामुळे आता चौथ्या टप्प्यातील कर्करोगावरही यशस्वी मात करता येते, हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

